आपण सर्वच जण सामान्य आहोत. आपल्याला कोणत्याही गोष्टीची थोडीफार जरी झळ लागली तरी आपण तक्रार करतो आणि थोडासा जरी फायदा झाला तरी सरकारचा उदो-उदो करतो. आपली मुले-बाळे, आपले आप्त-स्वकीय, आपले मान-अपमान, आपला फायदा-तोटा; ह्यांभोवती आपली मते फिरतात. त्यामुळे; आपणा सर्वांना लोकशाही कितीही श्रेष्ठ वाटत असली तरी; आपण व्यक्त केलेली प्रत्येक टीका-टिपण्णी आणि व्यक्त केलेले प्रत्येक मत विचारात घ्यायच्या लायकीचे असतेच असे नाही, हे इतरांप्रमाणेच आपल्याला देखील पक्के माहीत असते.
कुंभ मेळाच नव्हे तर इतर यात्रा व उत्सवांबद्दल निस्वार्थपणे टीका-टिप्पणी करण्यासाठी व लोकशाही खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी आणि बळकट करण्यासाठी, आपल्यासारख्या सामान्य लोकांचे विचार देखील नामस्मरणाच्या योगाने; संकुचित कोशातून बाहेर आले पाहिजेत. अशा तऱ्हेने आपण निस्वार्थी आणि विशाल बनलो तरच; चांगल्या नेतृत्वाला समजून घेऊन बळ देऊ शकू किंवा स्वत: चांगले नेते बनू शकू!